नौसेनेला हाय अलर्ट जारी
नवी दिल्लीः देशात पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. लष्कर-ए-तय्यबाकडून हा हल्ला होण्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौसेनेला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या समुद्री मार्गे दहशतवादी देशात घुसखोरी करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे समुद्री क्षेत्रात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच तपास यंत्रणांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. कथित घुसखोरी करणाऱ्यांना मदत करत असल्याच्या संशयातून या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. केरळच्या संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं की, गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर भारतीय नौसेना समुद्र आणि किनारपट्टीच्या भागातल्या स्थितीवर नजर ठेवून आहे.
तत्पूर्वी श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.