तगडा उमेदवार गळाला लागतोय का? याबाबतची चाचपणी
कोथरुड : कोथरुड मतदार संघ मित्र पक्षाला सोडल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर करण्यात आले होते. मात्र भाजपकडून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढवणार असल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली गेल्याने राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा ही सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील एका मेळाव्यात अजित पवार यांनी कोथरुड मित्र पक्षाला सोडल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कडून इच्छूक असणाऱ्यांनी माघार घेत पक्ष सांगेल त्याचे काम करण्याची भूमिका घेतली होती. परंतु आता भाजपकडून आयात उमेदवार आल्याने राष्ट्रवादी ऍक्टिव्ह मोड मध्ये आली आहे.
राष्ट्रवादीकडे पक्षातील इच्छूक आहेतच पण इतर पक्षाचा कोणता तगडा उमेदवार गळाला लागतोय का याबाबतची चाचपणी चालू असल्याचे बोलले जात आहे. एखादा नवखा उमेदवार ही राष्ट्रवादी कडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच चंद्रकांत पाटील यांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कडून केला जाणार असल्याचे दिसत आहे.