ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्याची सकारात्मक भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई – राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये. तसेच ओबीसी बांधवांच्या हिताचे रक्षण व्हावे, ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आव्हान देण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता, दिल्लीतील वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यात येईल. विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढील कायदेशीर व्यूहरचना निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. राज्य सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. लोकसंख्यानुसार काही प्रवर्ग आरक्षित केले तरी आरक्षण 50 टक्‍क्‍यांच्या वर नेता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे मंत्री ओबीसीच्या मुद्यावर मोर्चे काढतात. दुसरीकडे न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात. तत्काळ सर्वोच्च न्यायालयात रिव्हू पिटीशन टाकली पाहिजे किंवा करोनाचे कारण देऊन निवडणुका घेता येणार नाहीत, असे सांगितले पाहिजे. यावरून ओबीसी समाजात असंतोष निर्माण होईल. ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला या प्रश्नावर राजकारण नको. ओबीसींची प्रश्न आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये ओबीसीला एकही सीट मिळणार नाही, असे ते म्हणाले.

मंडल आयोग 1994 पासून लागू

विधानसभेत नियम 57 अन्वये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात मंडल आयोग 1994 पासून लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसींसाठी आरक्षण लागू केले. ते आजपर्यंत कायम आहे. मुख्यमंत्री स्वत: याप्रकरणावर लक्ष ठेवून असून राज्य सरकार ओबीसी बांधवांचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.