न्यूयॉर्क- सर्वसाधारणपणे कोणत्याही देशामध्ये ग्रामीण भागातून शहराकडे नागरिकांचे स्थलांतरित होण्याचे प्रमाण असते; पण अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये याच्या उलट स्थिती दिसून येत आहे. अमेरिकेतील 56 मोठ्या शहरांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घटली असून या शहरांमधील नागरिक छोटी उपनगरे आणि इतर छोट्या शहरांमध्ये स्थलांतरित झाल्याची बाब समोर आली आहे.
अमेरिकेतील महानगरांचे महत्त्व झपाट्याने कमी होत असून अमेरिकेतील मध्यमवर्गीय नागरिकांना आता महानगरांमध्ये राहण्यापेक्षाही छोट्या शहरांमध्ये राहणे जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. अमेरिकेतील दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 56 शहरांची लोकसंख्या 1990 नंतर प्रथमच घटल्याची बाब नुकत्याच एका अहवालातून समोर आली आहे. या 56 शहरांमधून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इतरत्र स्थलांतरित झाल्यामुळे या शहरांमधील रिअल इस्टेटची मागणीही घटली असून इतर अनुषंगिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. महामारीच्या कालावधीनंतरच अमेरिकेतील मोठ्या शहरांमधील ऑफिसच्या जागाही रिकाम्या झाल्या आहेत.
रियल इस्टेट प्रकल्प तोट्यात जाण्याच्या भीतीने थांबवण्यात आले आहेत. महामारीच्या कालावधीनंतर वर्क फ्रॉम होम ही एक जीवनशैली आणि कामाची शैली बनत चालल्याने आपल्या शहरात राहूनच आपल्याला रोजगार मिळवता येतो ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी छोट्या शहरांमध्ये सुद्धा लोक स्थलांतरित होऊ लागले आहेत.
अमेरिकेतील ब्रोकिंग इन्स्टिट्यूशन या संशोधन संस्थेचे सीनियर प्रोफेसर विल्यम फ्री यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आयटी क्षेत्र, फायनान्स आणि रिअल इस्टेटमधील अनेक कर्मचारी महानगरे सोडून छोट्या शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. या सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांचे वेतनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि ह्याच लोकांनी आता महानगरे सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महानगरांच्या उत्पन्नावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नाचे प्रमाणही घटले आहे. केवळ अमेरिकाच नाही तर स्वीडन,ब्रिटन,डेन्मार्क आणि नॉर्वे या देशांमध्ये सुद्धा महानगरातून इतरत्र स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.