पवारांच्या राजकारणाला…. साताऱ्यातून सुरूंग !

सातारा – साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची आता केवळ औपचारिकता उरली आहे. सातारा जिल्ह्यात आपले राज्य असेल असे स्वप्नही खुद्द भाजपलाही दहा वर्षांपूर्वी पडण्याची शक्‍यता नव्हती. आपल्या परवानगीशिवाय जिल्ह्यात पानही हलणार नाही, असा काळ कॉंग्रेसने पाहिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही तसेच वर्चस्व होते. कॉंग्रेसच्या विरोधात काम करताना जनसंघ किंवा भाजपसाठी तळमळीने झटणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना कुठेच थारा मिळत नव्हता, अशीही वेळ होती. आता त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे.

गेल्या पाच वर्षांतील भाजपने कलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांना शिवेंद्रसिंहराजे यांच्या रूपाने मोठा नावाडी मिळाला आहे. त्यांना आता फक्त भाजपच्या होकायंत्रानुसार चालायचे आहे. जिल्ह्यातील एकेक सत्ता काबीज करण्यासाठी हा मोहरा भाजपला उपयोगी पडणार आहे. पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा खडा पचविलेल्या शिवेंद्रराजेंना नंतर विजयाने कधीही हुलकावणी दिलेली नाही. कॉंग्रेसच्या प्रत्येक मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान मिळविलेल्या अभयसिंहराजे भोसले याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेताना शिवेंद्रराजेंनी आपली स्वतःची प्रतिमा निर्माण केली. सहकारी संस्थांच्या कामातून जम बसविला. कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क तयार केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही आपले वजन राखले. अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्‍य उद्योगसमूहातील संस्थांवर वर्चस्व ठेवले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद मिळवून जिल्ह्याच्या राजकारणातही दबदबा निर्माण केला. सातारा शहर व तालुक्‍याच्या राजकारणावर आपले प्रभुत्त्व सिद्ध करताना त्यांनी कधी समजूतदारपणा दाखवला, कधी टोकाचा संघर्षही केला. या संघर्षातच त्यांच्या भाजप प्रवेशाची बीजे रोवली गेली. खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे यांचे मनोमीलन आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी सातारा शहर व तालुक्‍यापुरत्या मर्यादित होत्या. आता या संघर्षाचा सूर जिल्ह्याच्या राजकारणात घुमत राहणार आहे.

शिवेंद्रराजे यांच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वाटा आहेच. तरीही पक्ष सोडून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याला स्थानिक संघर्षात पक्षाने त्यांची केलेली गळचेपी कारणीभूूत आहे. त्याशिवाय राज्यातील राजकारणाची फोडणीही त्याला मिळाली. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाच्या संकेताने राष्ट्रवादी कॉंग्रेसला उतरती कळा लागण्याची सुरवात होणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात जाण्याचे आतापर्यंत कोणीही धाडस करत नव्हते.

आता परिस्थिती बदलत चालली आहे. त्याची सुरवात माणमधील नेते शेखर गोरे यांनी केली. त्यानंतर पवारांच्या विरोधात बंड करण्याची भूमिका राज्यात अनेक ठिकाणी दिसून आली. तरीही साताऱ्यासारख्या जिल्ह्यात पवारांविरूद्ध लढण्याची जोखीम पत्करणे कठीणच वाटत होते. शिवेंद्रराजेंनी त्यांची रयतमधील भेट टाळली. पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखतींना दांडी मारली. शिवेंद्रराजेंनी हे आव्हान स्वीकारले. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संघर्ष करीत असताना पक्षाने त्यांना कधीच ताकद दिली नाही.

हा सल त्यांच्या मनात कायम राहिला आहे. खरं तरं नगरपालिका निवडणुकीच्या वेळीच मनोमीलन तुटताना पवारांना योग्य तोडगा काढणे शक्‍य होते. दिलजमाई करणे शक्‍य होते. त्यांनी तसे काहीच केले नाही. ते केले असते तर ही संघर्षाची वेळही आली नसती. मात्र, पवारांनी दोघांमधील दरी वाढविण्यात नकळत हातभारच लावला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव शिवेंद्रराजेंच्या जिव्हारी लागणारा होता. लोकसभेसाठी उमेदवार बदलण्याची मागणी असो किंवा नंतरच्या काळात उदयनराजेंचा प्रचार करण्याची वेळ असो, शदर पवार यांच्या निर्णयांमुळे शिवेंद्रसिंहराजेंना नेहमीच नमते घ्यावे लागले. पवारांनी निर्णय दिल्यावर शिवेंद्रराजेंनी पक्षादेश मानून काम केले. लोकसभा निवडणुकीनंतर सातारा विधानसभा मतदारसंघातील उदयनराजे व शशिकांत शिंदे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या समर्थकांच्या हालचालींनी शिवेद्रराजेंच्या मनाने उठाव केला. तक्रारी करूनही उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यावर त्यांना भाजपची वाट खुली झाली.

काही दिवसांपूर्वी सध्या भाजपत असणाऱ्या अमित कदम यांचा साताऱ्यात मेळावा झाला. त्यांनी रणशिंग फुंकले. त्याचा आवाज भाजपमध्येच घुमला. पश्‍चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवायचे असेल तर भाजपला शिवेंद्रराजेंसारख्या नेत्यांची फळी हवीच आहे. त्यामुळे भाजपच्या “घर’च्या उमेदवाराचा पत्ता कट करण्यात आला. दीपक पवार यांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन पक्षाने हा तिढा सोडविला. त्यावेळीच शिवेंद्रराजेंचा प्रवेश निश्‍चित झाला. आता भाजपमध्ये असणारे अमित कदम आता पुढे काही करतील ते करतील, पण शिवेंद्रराजेंची भूमिका पक्की झाली. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले म्हणजे भाजपची एक जागा वाढली इतके सोपे गणितही नाही. त्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे.

शिवेंद्रराजेंच्या प्रवेशाने उदयनराजेंची वाट आणखी सोपी होणार आहे. नेहमी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत नाही तर पक्षवाढीसाठीही प्रयत्न करतो, हे दाखविण्याची संधी ते सोडणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी ते सारी कौशल्ये उपयोगात आणतील. नगरपालिका निवडणुकीवेळी “आमदारही सर्वसामान्य असेल,’ ही उदयनराजेंची घोषणा कोणीही विसरलेले नाही. त्यामुळेच कदाचित अमित कदम राष्ट्रवादीकडे येऊ शकतात. कोरेगावातून शशिकांत शिंदे स्वगृही येऊ शकतात. कोरेगावमध्ये आणखी तिसराच उमेदवार पुढे येऊ शकतो. ही सारी बेरीज वजाबाकी अजून होत राहणार आहे. मूळ भाजपचे रंगही अजून फिके आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजेंना सावध खेळी करतच पुढे यावे लागणार आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदारंसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या संकेताने जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. स्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्‍यता त्यामुळे निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ज्या जिल्ह्याने भरभरून प्रेम दिले, त्याच जिल्ह्यातून त्यांच्या राजकारणाला सुरूंग लागणार, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

भाजपने गेल्या काही वर्षांत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ही ताकद डोके वर काढण्याची चिन्हे आहेत. या जिल्ह्यातील कॉंग्रेस कधीच भुईसपाट झाली आहे. उरल्यासुरल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला झोपविण्याच्या कामानेही आता गती पकडली आहे. त्यामुळे कॉग्रेसी संस्कृतीत रुजलेल्या जिल्ह्यात युतीचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र पुढील काळात दिसण्याची शक्‍यता आहे. केवळ विधानसभाच नव्हे तर जिल्ह्यातील एकेक सत्तास्थान काबीज करण्याच्या हालचाली आता दिसू लागतील.

रामराजेंची भूमिका महत्त्वाची
शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करते झाले की जिल्ह्यातील सत्तास्थानांना धक्का देण्याचा प्रयत्न भाजप करणार, याची शंका आता उरली नाही. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंकेसह विविध संस्थांमध्ये सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जिल्हा बॅंकेचे तर ते अध्यक्षच आहेत. जिल्हा परिषदेत शिवेंद्रराजेंच्या समर्थकांचे संख्याबळ महत्त्वाचे आहे. थोडीशी जोड मिळाली की खांदेपालट करण्यात अवघड नाही. बॅंकेतील संचालकांपुढे द्विधा अवस्था आहे.

अशा वेळी रामराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेणार त्यावर बरेचसे अवलंबून आहे. सातारा आणि फलटण एकत्र असतील तर दोन्ही संस्थांतील चित्र बदलू शकते. त्याशिवाय साखर कारखान्यांपैकी कृष्णा, बाळासाहेब देसाई युतीकडेच आहेत. भुईंज, खंडाळा आणि प्रतापगड या कारखान्यांमध्ये मदन भोसले याचे राज्य आहे. मदन भोसलेही आता भाजपचे वजनदार नेते आहेत. शिवेंद्रराजे गेलेच तर “अजिंक्‍यतारा’ही त्यांच्या सोबत येऊ शकतो. अशी सारी गणिते भाजपने आखून ठेवली नसतील तरच नवल.

अमित कदम यांना “अच्छे दिन’
जावळीतील नेते अमित कदम यांनी साताऱ्यात मेळावा घेतला. तो त्यांच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरला. भाजपकडून ते इच्छुक असणे साहजिक होते. जावळीचे माजी आमदार जी. जी. कदम यांचा वारसा चालविताना त्यांनी गेल्या काही वर्षांत मोठी धडपड केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मातब्बर नेतेमंडळी असल्याने त्यांची तेथे काही डाळ शिजत नव्हती. त्यांमुळे त्यांनी भाजपचा मार्ग निवडला.

भाजपमध्ये असतानाही फारशी काही संधी मिळाली नाही. मात्र, विधानसभेसाठी ते इच्छुक राहिले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राजकारणाच्या पटलावर ते पिछाडीवर पडत गेल्याचे चित्र होते. आता हे चित्र एकदम पालटून गेले आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादीमधून त्यांना संधी मिळू शकते. खासदार उदनराजे यांची भूमिकाही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळेच आता त्यांचे राजकारण गती घेण्याची चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.