भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे राजकारण; जिल्हाध्यक्षांनी दिली ‘मावळ बंद’ची हाक

भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा आरोप

वडगाव मावळ – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्यावर राजकीय आकसातून त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मावळ तालुक्‍यात सध्या विकासाचे राजकारण न करता भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केली जात आहेत. याशिवाय अनेक सदस्यांवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मंगळवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत केले.

वडगाव मावळ येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत गणेश भेगडे यांनी अनेक गंभीर आरोप केले. तसेच नेवाळे यांच्यावर खोटे गुन्हे केल्याच्या विरोधात बुधवारी (दि. 24) मावळ बंदची हाक दिली असून, मावळच्या जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी केले आहे.

या वेळी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे, नगरसेवक रघुवीर शेलार आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब शंकर नेवाळे यांना सोमवारी (दि. 22) अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना गुरुवारपर्यंत (दि. 25) पोलीस कोठडी दिली जाते. नेवाळे यांच्यावर एवढ्या तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. यावर हे सर्व षडयंत्र असल्याचे दिसत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य निवडणुका बुधवारी (दि. 24) व गुरुवारी (दि. 25) सरपंच व उपसरपंच निवडणुका होणार आहे.

सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या बळाचा वापर करुन अन्याय सुरू केला आहे. तालुक्‍याचे राजकारण कधीच इतक्‍या खालच्या स्तराचे नव्हते. सत्ताधाऱ्यांनी विकासाचे राजकारण करावे. जनतेची दिशाभूल थांबवावी नाहीतर मावळची जनता सुज्ञ आहे, असाही आरोप भेगडे यांनी केला आहे.

अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न – भेगडे
तळेगाव दाभाडे – बाळासाहेब नेवाळे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे, तो सचिवांनी केला असून, सत्ताधारी पक्षाचा काडीचाही संबंध नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करत त्यांना जागा दाखवून दिली. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही 80 टक्‍के ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व अन्य मित्र पक्षाचे (महाविकास आघाडी) सदस्य निवडून आल्याने ऐन सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दिवशीच “मावळ बंद’ची हाक दिली आहे. हा बंद केवळ अपयश लपवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. हे समजण्यासाठी मावळची जनता दुधखुळी नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.