-->

पुरंदरमध्ये आता श्रेयवादाचे राजकारण रंगणार!

वाल्हे (पुणे)- रस्त्याचे काम रखडल्याने सैनिकांचे गाव पिंगोरी (ता. पुरंदर) ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने संपूर्ण प्रशासनच हदरले होते. आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून एकमेकांवर चिखफेकही केली होती. त्यानंतर तातडीने रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे पत्रही व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 23) वाल्हे (ता.पुरंदर) येथे वाल्हे, पिंगोरी, साकुर्डे या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाचे श्रेय घेतले आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्षेप घेत पुन्हा भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. त्यामुळे आगामी काळात या रस्त्यावरून श्रेयवादाचे राजकारण तापले जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

रस्त्याची मंजुरी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मिळवली होती. मध्यंतरी कोविडच्या संकटामुळे आणि नंतर आचारसंहितेमुळे शासनाने स्थगिती दिली होती. त्यामुळे या विभागातील जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांनी ही बाब माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले होते, अशी महिती शालिनी पवार यांनी दिली. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शालिनी पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

भाजपही उडी घेणार का?

काही दिवसापूर्वीच पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी या रस्त्यांची दुचाकीवरून, पहाणी करून या रस्त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी आज थेट भूमिपूजन करून कामाचे श्रेय घेतले असल्याने आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस काय भूमिका घेणार आणि भाजपही या श्रेयवादात उडी घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असले तरी रस्ता होणार असल्याने ग्रामस्थ आनंदी आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पुरंदर पंचायत समितीत सभापती नलिनी लोळे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पवार, हरिभाऊ लोळे, माजी सभापती अतुल म्हस्के, गिरीश पवार, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, वागदरवडी सरपंच उषा पवार, युवा नेते सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, उद्योजक राहुल यादव, तसेच पिंगोरी गावातील ग्रामस्थ, प्रकाश शिंदे, धनंजय शिंदे, सुनील शिंदे, तेजस शिंदे, ठकसेन भोसले, शामराव शिंदे, विलास गायकवाड, हरीश्‍चंद्र यादव आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.