पन्नास कोटीच्या सिमेंट रस्त्यांसाठी राजकीय इच्छाशक्‍ती हवी

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेण्याची गरज

सातारा – सत्तेच्या साठमारीत सातारा जिल्ह्यातील काही नेत्यांची भाजप प्रवेशाची वेळ चुकल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. तत्कालीन फडणवीस शासनाने सातारा शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 50 कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारकडून तो निधी मिळवण्यासाठी माजी खासदार उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांना कंबर कसावी लागणार आहे.

महाराष्ट्रात भाजपचा सत्ता स्थापनेचा प्रयोग फसल्याने पक्षातील आयारामांची कोंडी झाली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे यांनी आमदारकीचा झेंडा पुन्हा रोवला असला तरी सत्तास्थापनेत महाआघाडी यशस्वी झाल्याने त्यांची कोंडी झाली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ता हवी म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, नियतीने त्यांना पुन्हा विरोधात बसवले आहे. लोकसभा पोटनिवडणूकीत झालेला उदयनराजे भोसले यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

उदयनराजे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा शब्द मिळाला असला तरी पुढच्या हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे दोघांच्याही संयमाची व मुत्सद्देगिरीची खरी परीक्षा आता होणार आहे. साताऱ्याची हद्दवाढ व कॉंक्रिट रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे पालिकेने 13 रस्त्यांचा प्रकल्प आराखडा अंतिम केला आहे. त्यामध्ये तांत्रिक मंजुरीचे टप्पे असून 50 कोटीचा निधी व शहराच्या हद्दवाढीसाठी दोन्ही राजांनी राजकीय कसब पणाला लावावे, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

राजकीय संबंधांचा फायदा व्हावा
उदयनराजे यांचे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांमधील अनेक नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेही राजकीय संबंध कोणाकोणाशी आहेत, ते सातारकरांना ठाऊक आहेत. दोन्ही बंधूंनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी शरद पवारांना राजघराण्याविषयी ममत्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुडाचे राजकारण करणार नसल्याचे सांगितले आहे. साताऱ्याच्या राजघराण्याचा दबदबा असल्याचे भान मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्रातील निर्णय घेताना त्यांना शरद पवारांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांनी आपल्या राजकीय संबंधांचा लाभ घेत मुत्सद्देगिरी दाखवावी, अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.