राजकीय चुळबूळ वाढली

मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील पुन्हा एक महिन्याच्या रजेवर आवास योजनेची

सातारा – सातारा पालिकेचे मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील पुन्हा एक महिन्याच्या रजेवर गेल्याने पंतप्रधान आवास योजनेची राजकीय चुळबूळ वाढली आहे. बांधकाम विभागातील पाटलांच्या केबिनला चक्क कुलूप लावण्यात आल्याने ही कसली दंडेलशाही असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. बिलो टेंडरिंग टाळून ओव्हर टेंडरिंगला भाऊसाहेब पाटील यांनी सहकार्य न केल्याची त्यांना राजकीय शिक्षा दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

भाऊसाहेब पाटील यांनी त्यांच्या ई मेलवरून एक महिन्याची पुन्हा रजा टाकल्याचे कळविले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्दयावरून मुख्याधिकारी व मुख्य अभियंता यांच्यात आलेले वितुष्ट पालिकेत चर्चेचा विषय बनले असून 205 कोटीच्या या योजनेने वादाची ठिणगी टाकली आहे. निविदेच्या मुद्दयावर पाटील यांनी फेरटेंडरची शिफारस करत नियमावर बोट ठेवले आहे. हीच गोष्ट मुख्याधिकारी शंकर गोरे यांना झोंबली मात्र त्याचा ठसका आधी सातारा विकास आघाडीतील काही नगरसेवकांना आला होता, मात्र हा ठसका सार्वत्रिक होण्याच्या आधीच भाऊसाहेबांची रजा तडकाफडकी नामंजूर झाली व केबिनला कुलूप लावण्यात आले या प्रकाराने पालिकेत सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे हसे झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणात नगर विकास आघाडी कायदेशीर दृष्टया डोळे वटारून बसली आहे. या प्रकरणाचे आयते कोलित सापडले असून नगरविकास आघाडी या विषयावर रानं उठवणार असल्याची चर्चा आहे. भाऊसाहेब पाटील तब्बल एक महिन्याच्या रजेवर गेल्याने तब्बल सव्वीस तातडीचे प्रस्ताव त्यांच्या सही विना विनाकारण खोळंबून पडणार आहे. ज्युनिअर अभियंत्याच्या सहया घेऊन त्यावर थेट मुख्याधिकाऱ्यांनी सह्या करायच्या या प्रकाराबाबत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. टोकाचा राजकीय दबाव आणि त्यांना वरिष्ठ असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनीच नियमांची मोडतोड सुरु केल्याने पाटलांना प्रचंड धक्का बसला आहे.

ओव्हरटेंडरिंगच्या प्रस्तावावर सही करण्याच्या कमालीच्या आग्रहातून वाद पुन्हा टोकाच्या दिशेला जाऊ लागला आहे. या वादाची कोंडी फोडण्यासाठी युध्दपातळीवर राजकीय प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याकरीता मुख्याधिकारी गोरे यांनी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याची पाठराखणं करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची उचललेली तळी हे खचितच न आवडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. पण साहेबांना बोलायचे कोणी ? हा खरा वादाचा मुद्दा आहे. उलट नियमबाह्य कामांना स्पष्ट नकार देणाऱ्या भाऊसाहेब पाटील यांच्या धाडसाचे साताऱ्यात मात्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.