सोमवारी सरकारच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता
बंगळूर – कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यादिवशी होणाऱ्या शक्तिपरीक्षेसाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती ठरवण्यात व्यस्त आहेत.
कॉंग्रेस आणि जेडीएस या सत्तारूढ आघाडीच्या गोटात शनिवारी बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू होते. मुंबईत मुक्काम ठोकून असणाऱ्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याची धडपडही सत्ताधारी गोटात सुरू होती. कर्नाटकमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनीही पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. भाजपचे संख्याबळ 106 इतके आहे.
तर सत्तारूढ आघाडीकडे केवळ 98 आमदार उरले आहेत. सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असे येडियुरप्पा यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले. तर सत्तारूढ आघाडीचे संकटमोचक म्हणून पाहण्यात येत असलेले कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांनी सोमवारी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्तारूढ आघाडीच्या 16 आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देत बंडाचे निशाण फडकावले. त्याशिवाय, 2 अपक्ष आमदारांनी सत्तारूढ आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आले आहे. त्यातून सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.