इंदापूर, [नीलकंठ मोहिते] – राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे; मात्र इंदापूर विधानसभेचे राजकीय चित्र, आघाडी-बिघाडी या वादात अस्पष्ट आहे.
तसे पाहिले तर विधानसभेची राजकीय लाइन कोणतेही नेत्याची क्लिअर नसल्याने तालुक्यातील कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. असे असले तरी देखील तुतारी चिन्हाची चर्चा मात्र निवडणुकीआधीच तालुकाभर रंगलेली आहे.
इंदापूर विधानसभेला काय होणार, हे सध्या तरी कोणताही राजकीय विश्लेषक ठाम सांगू शकत नाहीत.
भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची एकत्रित असल्याने व सध्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय भरणे असल्याने त्यांचे तिकीट महायुतीकडून फिक्स मानले जात आहे.
आमदार भरणे हे गावोगावी विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा व विविध उपक्रमाचा कार्यक्रमाचा धडाका सुरू ठेवला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार जो इंदापूर विधानसभेचा उमेदवार जाहीर करतील. त्याचे काम मनापासून करणार अशी राजकीय घोषणाच आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल्याने जनता मात्र फीदी फीदी हसत आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यात दौरे देखील वेगाने वाढलेले आहेत. गावागावातील कार्यकर्त्यांचा आग्रह, विधानसभा भाऊ तुम्ही लढाच, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत. बाकी सर्व आम्हा कार्यकर्त्यांवर सोडा.
आजपर्यंत तुमचे ऐकले आहे. आता आमचे ऐका, असे तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते आग्रह धरत आहेत. हर्षवर्धन पाटील भाजप सोडतील असे वातावरण मागील आठवड्यापूर्वी इंदापूर तालुक्यात झाले होते; परंतु खुद्द हर्षवर्धन पाटील आजपर्यंत भाजप सोडणार आहेत. असे एकदाही बोलले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व चिन्ह तुतारी, तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांचे यांना म्हणणारे असंख्य कार्यकर्ते कित्येक दिवसापासून, सोशल मीडियावर फिरवत आहेत; परंतु मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी गणराया आरतीच्या निमित्ताने स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी मी भाजप सोडणार, असे मी कधी म्हणालोच नाही.
माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तं निर्णय घेतील. असे म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यात मोठी राजकीय गडबड सुरू झाली.
लोकसभा निवडणुकीतच इंदापूर तालुका हा तुतारीमय झाला असल्याचा निकालच जाहीर झाला. खासदार सुप्रिया सुळे यांना या तालुक्यात मतांची मोठी आघाडी मिळाली.
राजकीय अस्थिरता असताना, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, नीरा भीमा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन कांतीलाल झगडे, बाजार समितीचे विद्यमान सभापती विलासराव माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मनापासून लोकसभा निवडणुकीत साथ दिली.
खासदार सुप्रिया सुळे लोकसभेला विजय होताच इंदापूर तालुक्यात विधानसभेला तिकीट उमेदवारी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा या दोघांपैकी एकाला मिळणार असे ठामपणे बोलले जात होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला. तद्नंतर प्रवीण माने यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा रंगली.
प्रवीण माने यांनी जोरदार सामुदायिक विवाह सोहळ्यापासून तालुक्यामध्ये कामही सुरू केले आहे. तर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची विधानसभेची परिपूर्ण तयारीच झाली आहे. असे तालुक्यात बोलले जाते. यातील बहुतेक मोठे इच्छुकांनी पक्षांकडे उमेदवारी साठी अर्ज मागितलेे आहेत.
वाजवा तुतारी…
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना दिलेला शब्द पाळला जात नाही. त्यामुळे वाजवा तुतारी, हा नारा कार्यकर्ते आजपर्यंत देत आहेत; परंतु आजपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठाम वक्तव्य सोडले तर, एकाही राजकीय लीडरने इंदापूर विधानसभेची घोषणा केलेली नाही. त्यामुळे तालुक्यात राजकीय लाइन अस्पष्ट आहे. हे मात्र नक्की.