पुणे – मास्क घालण्यास सांगितल्याने व्यावसायिक तसेच त्याच्या साथीदाराने पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना नाना पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी रितेश नंदकुमार कासट (वय 43) आणि कृष्णा मलप्पा अंतरगंगी (वय 25, दोघे रा. नाना पेठ) यांना अटक केली.
पोलीस शिपाई विजय भोसले यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस शिपाई भोसले बुधवारी दुपारी चारच्या सुमारास नाना पेठेतील पालखी विठोबा चौकात गस्त घालत होते. त्यावेळी कासट दुकानात मास्क न घालता व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.
भोसले यांनी त्यांना मास्क घालण्यास सांगितले. तेव्हा कासट, अंतररंगी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने भोसले यांना कारवाई करण्यास विरोध केला. त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक परवेझ शिकलगार तपास करत आहेत.