शेतमाल नदीत फेका पोलिसाची शेतकऱ्यास अरेरावी 

संगमनेर  -संगमनेर तालुक्‍यातील घारगाव येथे शेतकरी शेतातील शेतमाल विक्री करत असता एका पोलीस कर्मचाऱ्याने हा शेतमाल विक्री न करता नदीत फेकून दे, असे म्हणत अरेरावी केली होती. त्यामुळे या शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेणे मुश्‍कील झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रशासन नियमाच्या अधीन राहून शेतकऱ्यांना उत्पादित शेतीमाल विक्रीची व्यवस्था करत आहे. कुरकुंडी येथील इस्माईल पटेल हे काकडी विक्री करण्यासाठी घारगाव येथे गेले होते.

दरम्यान घारगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना हा शेतमाल विक्री न करता नदीत फेकण्यास सांगितले. तर लॉकडाऊनमुळे माझ्या साडेतीन एकर शेतातील उत्पादित झालेला काकडी हा शेतमाल कसा विक्री करायचा, असा माझ्या पुढे प्रश्न पडला असून, अशा प्रकारे जर शेतीमाल विक्री करण्यास अडचणी आल्या, तर मोठे नुकसान होणार आहे. शासनाने याबबत नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.