भांडण सोडविणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाची गचांड पकडून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास भिंगार येथील बेरडगल्ली येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, संजय आनंदा कापसे याचे व त्याची बहीण सुजाता बाळासाहेब बेरड यांच्यात घरगुती कारणावरून भांडणे चालू असताना सुजाता बेरड यांनी नियंत्रण कक्ष येथे फोन करून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने फोन करून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष रामभाऊ पाटील यांना घटनास्थळी पाठवले. पो. कॉ. पाटील यांनी सदर भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला.

हे सरकारी काम करीत असताना संजय आनंद कापसे व मनीषा संजय कापसे (दोघे रा. बेरड गल्ली, भिंगार) यांनी पाटील यांच्या गणवेशाची गचांडी धरून शर्टच्या दोन गुंड्या तोडल्या आणि धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व घटना स्थळावरून पसार झाले. याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी पो. कॉ. सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.