“त्या” -बाप-लेकीच्या कृतीने पोलीसही भारावले…!

इस्लामपूर (विनोद मोहिते) – वेळ सकाळी साधारण दहाची…. इस्लामपूर शहरात जनता कर्फ्यु….रस्त्यावर सर्वत्र सन्नाटा……बाप-लेक गाडीवरून येतात..चौका-चौकात पोलीस पाहून दुचाकी थांबवतात.. अन् थेट पोलिसांच्या हाती मिठाईचा बॉक्स ठेवतात..पोलिसही गोंधळात पडतात… ती मुलगी म्हणते..” थँक्स काका… तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोतच… पण कोरोनाच्या महामारीत ” तुम्ही घर-दार, कुटूंबाला विसरून रस्त्यावर उतरलाय…तुम्हाला सलाम….. असे म्हणत ती तरुणी थेट पोलिसांचा चरणस्पर्श करते..अन् पोलीसही भारावतात.हा प्रसंग अनुभवला तो आज बुधवारी इस्लामपूरात ( जिल्हा-सांगली) येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस बांधवानी….

स्मिता व श्रीकांत पवार या बाप-लेकीने असे काही केले अन् पोलीस भारावून गेले. स्मिता ने बी टेक ची पदवी घेतली आहे. तर ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. प्रशासकीय इमारती शेजारी राहणारे हे पवार कुटूंब आहे. महाराष्ट्रदिनी तिच्या डोक्यात ही कल्पना आली. पण दोन दिवसांपूर्वी तिने आपल्या कुटूंबाला ती सांगितली. वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता मिठाईचे पंधरा बॉक्स खरेदी करून आणले. तो पर्यत जनता कर्फ्यु घोषित झाला.

कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत पोलिस बांधव आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात. अशावेळी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीकांत पवार हे लेक स्मितासह घराबाहेर पडले.

पेठ-सांगली रस्ता, वाघवाडी चौक, गांधी चौक,यल्लमा चौक,कचेरी परिसर, मंडई,बाजार, बस स्थानक परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस बांधवांना मिठाईचे वाटप केले. यावेळी पोलिसांनीही स्मिताच्या आपुलकीचे कौतुक केले. आपल्यालाही जाणणारे समाजात आहेत.अशा भूमिकेमुळे आमचेही आत्मबळ वाढते असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

स्मिता म्हणाली,पोलिस बांधव गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर आहेत. त्यांनाही मुलं-बाळ कुटुंब आहे. कुटूंबापासून ते नेहमीच दूर राहत आहेत. त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवायला हवे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस पुढे असतात.अशावेळी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरात फिरून चौकात बंदोबस्तासाठी उभे असणाऱ्या पोलिस बांधवाना मिठाईचे वाटप केले आहे.

यापूर्वी समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या स्मिताने जानेवारी महिन्यात वाढदिवसानिमित्त येथील अनाथाश्रमात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना दोन टँकर पाणी दिले होते. आई शुभांगी व वडील श्रीकांत रघुनाथ पवार यांनी या उपक्रमासाठी तिला प्रोत्साहन दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.