पोलीस सेवेतून बडतर्फ
पुणे – बांगलादेशी तरुणीला वेश्याव्यवसायात आणणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना मदत केल्याबद्दल पोलीस हवालदार हनुमंत महादेव वणवे याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. त्याची नेमणूक फरासखाना पोलीस ठाण्यात होती.
विशेष म्हणजे फरासखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईतील आरोपींनाच त्याने मदत केली होती. तसेच, संबंधीत कुंटणखाना त्याने स्वत:च्या पैशातून खरेदी केला होता. इतकेच नव्हे तर फरासखाना पोलिसांनी कोणती मोहीम आखली तर तो त्याची माहिती कुंटणखाना चालकांना देत होता. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी चौकशीअंती हवालदार हनुमंत वणवे याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले.
एका 23 वर्षांच्या बांगलादेशीय तरुणीला वेश्याव्यवसायात लावून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी एक कुुंटणखानाचालिका व घरमालक गणेश भोसले यांना फरासखाना पोलिसांनी 31 डिसेंबर 2019 रोजी कारवाई करून अटक केली होती. कुंटणखाना चालिकेचा मोबाइल तपासल्यावर पोलीस हवालदार हनुमंत वणवे याचे कुंटणखाना चालिकेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवार पेठेतील भगत बिलिंडगमधील फ्लॅट आरोपी कुंटणखाना चालिका व गणेश भोसले यांच्या नावावर होता.
प्रत्यक्षात त्यासाठी हनुमंत वणवे याच्या पैशाने खरेदी करण्यात आला होता. फ्लॅट खरेदीच्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून वणवे याची सही आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात वणवे नेमणुकीला असल्याने पोलिसांनी काही मोहीम आखली तरी ती अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. हवालदार हनुमंत वणवे याने वेश्याव्यवसायात ढकलेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी आरोपींना मदत करून वेश्याव्यवसायास प्रोत्साहन देऊन गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले.