पोलिसाने समाजवादी पक्षाची टोपी घालून कलेक्‍टर कचेरीत उडवली धमाल

इटावा – उत्तरप्रदेशातीाल प्रोव्हेन्शियल आर्मड कॉन्स्टेब्लरी म्हणजेच पॅक दलातील एका कॉन्स्टेबलने आज पोलिसांच्या पुर्ण गणवेषात डोक्‍यावर समाजवादी पक्षाची कॅप घालून कलेक्‍टर कचेरीत योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी करीत आज चांगलीच धमाल उडवली. मुनिष यादव असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो इटावा जिल्ह्यातील आपल्या घरी सुटीसाठी आला आहे.

आज तो अचानक पोलिसांच्याच वेषात समाजवादी पक्षाची टोपी घालून कलेक्‍टर कचेरीत आला आणि त्याने योगी अदित्यनाथ यांचे सरकार त्वरीत बडतर्फ करण्याची मागणी करून अधिकाऱ्यांना अवाक केले. तेथे उपस्थित असलेल्या वार्ताहरांनी त्याला गाठले असता त्यांच्याशी बोलताना तो म्हणाला की योगींच्या राजवटीत उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून राज्यात रोज हत्या, बलात्कार आणि दरोडखोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे सरकार लगेच बरखास्त करण्याची गरज आहे.

या प्रकारामुळे आपली नोकरी जाण्याची भीती वाटत नाही काय असे विचारता तो म्हणाला की मला माझ्यापेक्षा लोकांची आणि समाजाची अधिक काळजी आहे. त्यामुळे मी नोकरीची फिकीर करीत नाहीं. पण त्याने उडवलेली ही गडबड लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी मात्र तो तेथून पळून गेला. या प्रकाराविषयी त्याच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले की कोणी तरी दारू पाजून त्यांना भडकावले आहे आणि त्याच प्रभावात त्यांनी हे कृत्य केले असावे. सरकारी सेवा कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर संबंधीत कलमान्वये कारवाई केली जाईल असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.