प्रशासनाची माहिती : मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे आढावा बैठक
पुणे – शहरात सध्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर 71 टक्के असून तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
मंत्रालयात “पीएमआरडीए’ची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्राधिकरणाचे आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते. बैठकीत पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला.
यावेळी “पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे,’ अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
यावेळी पुणे महानगर परिवहन, सामाजिक, पायाभूत सुविधा, पर्यावरण विषयक प्रकल्प आणि नगरविकासाचे नियोजनाचा मूलभूत प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. सर्वंकष वाहतूक आराखड्याची चार टप्प्यांत अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनांमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गिका कार्यरत करण्यात येणार आहेत. यावेळी मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य वळण रस्ता, पाणीपुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.