पुणे – महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट 23 गावांचा विकास आराखडा (डीपी) “पीएमआरडीए’ने जाहीर केला. मात्र, त्यात मुठा तसेच रामनदी भागातील निळी आणि लाल पूररेषाच दर्शवलेली नाही. त्यामुळे या गावांमध्ये नदीपात्र आणि लगत होणारे अतिक्रमण रोखण्यासह, विकसनाची हद्द निश्चित करणे अडचणीचे होणार आहे.
महापालिकेने या रेषा दर्शविण्याची सूचना “पीएमआरडीए’ला केली आहे. या आराखड्यावरील हरकती आणि सूचना नोंदवण्याची मुदत गुरुवारी संपत असल्याने, महापालिकेने या आराखड्यावर 23 गावांबाबत सुमारे 28 सूचना नोंदवल्या आहेत.
शहरात नदीकाठ परिसरात झालेली अतिक्रमणे तसेच महापालिकेने केलेल्या विकासकामांवरून न्यायालयीन वाद झाले आहेत. परिणामी, महापालिका आणि पाटबंधारे विभागाची कानउघडणी करत या रेषा निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्यानुसार, महापालिकेच्या विकास आराखड्यात या रेषा दर्शवल्या आहेत. मात्र, आता खडकवासलापासून मांजरीपर्यंतची गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे हद्दीबाहेरच्या मुठा तसेच रामनदीचा समावेश पालिकेच्या हद्दीत झाला आहे. त्यामुळे या नद्यांच्या पूररेषा निश्चित असणे अपेक्षित आहे. ही पूररेषा आराखड्यात न आल्यास त्यामुळे नदीच्या भागात बांधकामांना परवानगी देण्यात अडचण येणार असून, नदीकाठच्या भागात अतिक्रमणे होऊन नदीचे पात्र कमी होण्याची शक्यता आहे.
बांधकामेही दर्शवली नाहीत
या “डीपी’मध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष झालेली बांधकामे तसेच इमारती दर्शविण्याची सूचनाही देण्यात आली आहे. याशिवाय “पीएमआरडीए’ने मंजूर केलेली बांधकामांची रेखांकने दर्शवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही बांधकामे दाखवण्याची सूचनाही महापालिकेने केली आहे.
न्यू कोपरे गावाचा समावेश डीपीत करावा, ऍमेनिटी क्षेत्रांची संख्या वाढवावी, नाल्यांलगत निवासी क्षेत्रात 9 मीटरचे नाला गार्डन प्रस्तावित करावे, रामनदीचे क्षेत्र वॉटरबॉडी म्हणून जाहीर करावे, वाघोली गावाची हद्द सुधारीत करावी अशा वेगवेगळ्या सूचना पालिकेने दिलेल्या आहेत.