पीएमपीच्या ‘अमानुष’ कारभाराचा कहर

कर्मचारी चार दिवसांपासून रुग्णालयात उपचाराविना पडून


वैद्यकीय योजनेतील पैसे थकल्याने उपचारास रुग्णालयाचा नकार

पुणे – पीएमपीचा कर्मचारी मागील आठवड्यापासून उपचाराविना रुग्णालयात खितपत पडला आहे. वैद्यकीय योजनेच्या माध्यमातून उपचार करून देतो, अशी सुरुवातीला हमी व त्यानंतर अचानक 40 हजार रुपयांचे बिल रुग्णालयाने माथी मारल्याने सदर कर्मचारी चक्रावला. यावेळी कर्मचाऱ्याने पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधल्यास आपण सदर रुग्णालयाचे वैद्यकीय योजनेचे पैसे थकविल्याने बिल भरुन तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या कर्मचाऱ्याला रुग्णालय व पीएमपी प्रशासन या दोघांच्या “अमानुष’ कारभाराचा फटका बसला असून गेल्या चार दिवसांपासून पीएमपी कर्मचाऱ्यांवर उपचार बंद आहेत.

कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पीएमपीएमएलची वैद्यकीय अंशदायी योजना आहे. या योजनेसाठी प्रशासन दर तीन महिन्यांनी दीड कोटी रुपये देते. मात्र, मागील काही महिन्यांपासून पीएमपीने योजनेसाठी पैसे दिले नाहीत. यामुळे अनेक रुग्णालयांनी पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी दारे बंद ठेवली आहेत.

आठवड्यापूर्वी कोथरुड डेपोतील कर्मचारी आदेश चव्हाण हाताची नस दबल्याने एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. त्यांनी पीएमपीचे कार्ड दाखविल्यानंतर योजनेच्या माध्यमातून एकूण बिलात 90 टक्के सूट देणार असल्याचे सांगितले. मात्र, दोन दिवसानंतर बिल भरावयास सांगितले. याबाबत कर्मचाऱ्याने पीएमपी प्रशासनास माहिती सांगूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, आपण सध्याच्या परिस्थितीनुसार 10 हजार रुपये भरण्यास तयार असल्याचे आदेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

मी आठवडाभरापासून रुग्णालयात आहे. सुरुवातीला पीएमपीचे कार्ड दाखवल्यानंतर योजनेच्या माध्यमातून उपचार करण्याची हमी रुग्णालयाने दिली होती. मात्र, आता संपूर्ण बिल भरण्यास सांगत आहेत. तसेच चार दिवसांपासून त्यांनी माझ्यावरील उपचार बंद केले असून पीएमपी प्रशासनाने लक्ष द्यावे.
– आदेश चव्हाण, पीएमपी कर्मचारी

Leave A Reply

Your email address will not be published.