“पीएमपी’ला पाच वर्षात 834 कोटींची संचलन तूट

लेखा परीक्षण अहवाल : प्रत्यक्ष उपाययोजनेबाबत अद्याप दक्षता नाही

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाला 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षांत तब्बल 834 कोटी रुपयांची संचलन तूट झाली आहे. या तुटीचा सर्व भार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर पडला. पीएमपीने 2009 ते 2017 या आठ वर्षांमध्ये जेएनएनयूआरएमच्या निधीतून 650 बस खरेदी केल्या. तर, 653 बस भाडेतत्त्वावर घेतल्या. संचलन तुटीतून मात्र एकही नवीन बस खरेदी केली नसल्याचे निरीक्षण पिंपरी महापालिका लेखा परीक्षण विभागाने 2017-18 च्या लेखा परीक्षणात नोंदविले आहे.

“पीएमपी’ची संचलन तूट प्रमाणित करण्यासाठी 31 ऑक्‍टोंबर ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत लेखा परीक्षण करण्यात आले. लेखा परीक्षण विभागाकडून आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे हा अहवाल सादर केला. तर, फेब्रुवारी – 2019 मध्ये स्थायी समिती सभेत या अहवालाचे अवलोकन झाले. मात्र, प्रत्यक्ष उपाययोजना करण्याबाबत पीएमपीएमएलने अद्याप पुरेशी दक्षता घेतलेली नाही.

पीएमपीएमएलच्या 2017-18 च्या वार्षिक अहवालानुसार एकूण उत्पन्न 658.52 कोटी इतके होते. तर, एकूण खर्च 863.14 कोटी इतका राहिला. त्यानुसार संचलन तूट 204 कोटी 62 लाख असल्याचे प्रमाणित करण्यात आले. पीएमपीएमएलच्या ताफ्यात 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या 254 बस आहेत. या जुन्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा खर्च वाढलेला आहे. या बस रस्त्यावर वारंवार नादुरूस्त होतात. पर्यायाने, दरवर्षी नवीन बस ताफ्यात येण्यासाठी नियोजन करणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे मत लेखा परीक्षण अहवालात मांडले आहे.

संचलन तूट कमी करण्यासाठी प्रमुख उपाययोजना
-मेट्रो स्थानकांचा विचार करून मार्गांची रचना करावी.
-पर्यायाने मेट्रो मार्गासाठी पूरक सेवेचे जाळे निर्माण होईल.
-जाहिरात उत्पन्नात वाढ होणे आवश्‍यक आहे.
-प्रशासकीय पातळीवर फेरबदल करणे गरजेचे आहे.
-आगार व्यवस्थापक व आगार अभियंता यांना उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य निश्‍चित करून द्यावे.
-आरक्षित जागा हस्तांतरित करून उपनगरात आगार विकसित करून देणे आवश्‍यक आहे.
-गर्दीच्या ठिकाणी आगार स्थलांतरीत करून व्यावसायिक इमारती उभारता येतील.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय गतिमानता व उत्पन्न वाढ याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)