सोरतापवाडी – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील कै.आण्णासाहेब मगर उपबाजारात शेतकऱ्यांची तोलणार, कर्मचाऱ्यांकडून पठाणी कर वसुली सुरू असल्याचे वृत्त प्रभातमध्ये दि. 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. शेतकऱ्यांची लूट थांबविली. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दर फलक लावण्यात आले आहेत.
हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील शेतकरी मारुती चौधरी व कुंजीरवाडी येथील शेतकरी नंदकुमार धुमाळ यांनी मांजरी उपबाजारामध्ये शेतकऱ्यांनकडून जबरदस्तीने कर वसुली होत असल्याचा तक्रार अर्ज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दिला होता. मांजरी येथील उपबाजारात शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतो. उपबाजारात व्यापाऱ्याकडून कर वसूल करणे सक्तीचे असताना तोलणार, कर्मचाऱ्यांची परिस्थिती भयानक होती. बाजारामध्ये बाजार फी, सेवा कर हा व्यापाऱ्यांकडून वसूल करणे सक्तीचे असताना तोलणार, कर्मचारी शेतकऱ्यांकडून 3 ते 5 टक्क्यांप्रमाणे वसूल करीत होते. बाजाराच्या आवारात कोणत्याही प्रकारचा फलक नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. याबाबतचे वृत्त प्रभातमध्ये प्रसिद्ध होताच बाजाराच्या आवारात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी दर फलक लावले आहे. तसेच शेतकऱ्यांनी किती पैसे द्यायचे, हे माईकवरून सांगत आहेत. शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मांजरी उपबाजारामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक थांबली आहे.
शेतकऱ्यांची उपबाजारात कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. आम्ही बाजाराच्या आवाजात दर फलक लावले असून येथून पुढे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल त्यांनी तसे लेखी स्वरूपात कळवावे. योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– दिलीप घावटे, विभाग प्रमुख, मांजरी.