नवी दिल्ली : झारखंडच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेने एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बारापेक्षा जास्त आमदारांच्या संपर्कात होते असेही सांगण्यात आले आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदारांचा घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा कोंगारीने केला आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. सरकार पाडण्याविषयी देण्यात आलेल्या ऑफरबद्दल बोलताना काँग्रेसचे आमदार कोंगारी म्हणाले, “हे तिन्ही लोक माझ्यापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पोहोचले होते. काही कंपन्यांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितले होते. मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केले, पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात यायचे.
एकदा तर त्यांनी मला रोख १ कोटींची ऑफर दिली. ही ऑफर आल्यानंतर मी लागलीच हे सगळं पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्या कानावर घातले . याबद्दल मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती”, असे आमदार कोंगारी म्हणाले.