नगरमधील खेळाडूंनी ऑलिम्पिक गाठावे

आंतरराष्ट्रीय खेळ विकास दिनानिमित्त वाडिया पार्क येथे विविध कार्यक्रम

नगर –
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतील अनेक खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि नगरमधील खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे नगरमध्येही चांगले खेळाडू तयार होत आहे. जिल्हा क्रीडा संकुल हे राष्ट्रीय दर्जाचे असून, यामधील सोयी-सुविधांमुळे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात. आता पुढेही आणखी चांगल्यापद्धतीने विकास करुन खेळाडूंसाठी जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून होत आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरुन नगरमधील खेळाडूंनी ऑलपिंकपर्यंत मजल मारावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

आतंरराष्ट्रीय खेळ विकास दिनानिमित्त वाडिया पार्क येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बोलत होते. याप्रसंगी मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, आदर्शगांवचे पोपटराव पवार, क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नवांदे, ज्ञानेश्‍वर खुरंगे, जवाहर मुथा, अशोक काळे, मिलिंद कुलकर्णी, सुरेश खामकर आदि उपस्थित होते.

यावेळी पोपटराव पवार म्हणाले, वाडिया पार्क मैदान हे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक वरदान आहे. मी सुद्धा पुर्वी याच मैदानावर सराव केला आहे. आता निर्माण झालेले हे क्रीडा संकुल राज्यातील नामवंत संकुलापैकी एक आहे. येथील सुविधा आणि विविध खेळांसाठीची मैदाने यामुळे येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय सामने होतात ही नगरकरांच्यादृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. संघटनांनी समन्वयातून या ठिकाणी चांगल्या स्पर्धांचे आयोजन करुन नगरमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे सांगितले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळ विकास दिनाविषयी माहिती देतांना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे म्हणाल्या, सन 1896 या वर्षी उन्हाळी ऑपिलिंक या खेळास प्रथम सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा अथेंन्स, ग्रीस या ठिकाणी दि.6 ते 15 एप्रिल 1896 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली. यामध्ये 14 देशांतील 241 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेमध्ये 43 खेळांचा समावेश करण्यात आला आणि असे ठरले की, ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येईल व ऑलिंपिक खेळाची सुरुवात झाली. आजपर्यंत 30 ऑलिंपिकमधून भारताला 28 पदके मिळाली आहेत.

भारताने 1900 मध्ये या खेळामध्ये खेळायला सुरुवात केली. 1952 साली खाशबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावले व ते भारताचे प्रथम ऑलिंपिक पदक विजते ठरले.प्रास्तविकात क्रीडाअधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी या आंतराष्ट्रीय खेळ विकास दिनाची संकल्पना व रुपरेषा सांगितली. सूत्रसंचालन आश्‍लेषा भांडारकर यांनी केले तर आभार दिपाली बोडखे यांनी मानले. याप्रसंगी नाना डोंगरे, दिनेश भालेराव, संजय धोपावकर, आनंद कडूस, पवन नाईक, घनश्‍याम सानप, सुरेखा शिरसाठ, संतोष खैरनार, पल्लवी सैंदाणे आदिंसह खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.