रस्ता दुभाजकांतील झाडांबाबत नियोजनशून्य कारभार
कात्रज : कात्रज ते नवले पूल दरम्यान देहूरोड बाह्यवळण या महामार्गावर दत्तनगर मंदिरजवळील सर्व्हिस रोड व मुख्य रस्त्यामधील दुभाजक जागेतील झाडे तोडली जात आहेत. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून रुंदीकरणाच्या कामासाठीच ही झाडे तोडली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकूण 200 पेक्षा अधिक झाडांची उंची सध्या 15 फुटांपेक्षा अधिक असून ती चांगली वाढीस लागली आहेत, अशा स्थितीत या झाडांचे स्थलांतर करणे गरजेचे असताना त्याची तोड केली जात असल्याने पालिकेचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे.
महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणमार्फत दोन वर्षांपूर्वी येथे वड, पिंपळ, गुलमोहर अशा प्रकारची जवळपास 300 झाडे लावण्यात आली होती. ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्यातील अंतर अधिक असणे गरजेचे असताना त्यांच्यातील अंतर चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आल्याने काही झाडे जळून गेली आहेत. तसेच, टॅंकरचे पाणी सर्वच झाडांना समान पद्धतीने मिळत नसल्यानेही अशी झाडे जळून गेली आहेत.
महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामार्फत ही झाडे लावून झाल्यानंतर याच्या देखभालीसाठी एका टॅंकर व दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत येथे टॅंकर आणि कर्मचारी फिरकत नसल्याची स्थिती आहे. या झाडांची काळजी घेत जात नसल्याचे तक्रार नागरिकांनी प्रशासनाकडे केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे झाडे लावण्यासाठी मोठा खर्च केला जात असताना लावलेली झाडे जगविण्याकरिता मात्र दुर्लक्ष केले जात आहे.