संशयास्पद ड्रग्ज असलेले विमान महामार्गावर उतरले

 

 

मेक्‍सिको सिटी, (मेक्‍सिको)- काही संशयास्पद ड्रग्ज असलेले एक छोटे विमान मेक्‍सिकोमधील क्विंटाना रू प्रांतातील एका महामार्गावर उतरले. हे विमान उतरत असतानाच पेटले होते. विमान हायवेवर उतरल्यानंतर ते जळून गेले. या विमानाबाबत माहिती मिळताच हवाई दलाची विमाने या संशयास्पद विमानाच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. ग्रामीण भागातील कमी रुंदीच्या महामार्गावर हे पेटलेले विमान उतरत असताना जवळच्या पोलिसांनी दूरून बघितले होते. हे विमान दक्षिण अमेरिकेतून आले होते. मेक्‍सिकोच्या हवाई हद्दीमध्ये शिरल्यापासून या विमानावर लक्ष ठेवले गेलेले होते.

हे विमान ज्या हाय-वेवर उतरले तो हाय-वे युकातन प्रांताच्या दिशेने जाणारा आहे. या हाय-वे वर सुरक्षा रक्षकांना एका पिक अप ट्रकमध्ये कोकेनने भरलेली 13 पोती आढळून आली. या पोत्यांचे एकूण वजन 850 पौंड (390 किलो) इतके आहे. या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या विमानाने इमर्जन्सी लॅन्डिंग का केले, विमान हवेतच पेटले होते का किंवा तस्करांनीच या विमानाला आग लावून ते नष्ट केले याबाबत स्पष्टता नाही. अमली पदार्थांची तस्करी करणारे तस्कर अशाप्रकारे तस्करीची विमाने, वाहने नेहमीच नष्ट करत असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.