मेट्रोसाठी विनानिविदा मिळणार जागा

स्थायीची मंजुरी : बोपोडी येथे पार्किंग, स्टेशन सुविधा

पुणे – “महामेट्रो’ प्रकल्पाला पार्किंग आणि स्टेशन सुविधेसाठी बोपोडी येथील जागा “महामेट्रो’ला हस्तांतरीत करण्याला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. ही जागा मेट्रोलाच देण्यात येणार असल्याने ती विनानिविदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महामेट्रो यांनी संदर्भात महापालिकेकडे प्रस्ताव पाठवला होता. पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेलगत पार्किंग आणि स्टेशन सुविधेसाठी आवश्‍यक असणारी महापालिकेची बोपोडी जुना जकात नाका सर्व्हे नं. 10 येथील सुमारे 2400 चौ. मी. जागा हस्तांतरीत करण्यासंदर्भात महामेट्रोने प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला.
ही जागा सुमारे तीन एकर, तीन गुंठे आहे. जकात नाक्‍यासाठी महापालिकेने भूसंपादनाने महापालिकेच्या ताब्यात आली आहे. यातील काही जागेमध्ये महापालिकेचा दवाखाना आहे. तसेच सुमारे 200 चौ. मी. जागा पोलीस ठाण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. तसेच काही जागा रुंदीकरणामध्ये बाधित झाली आहे. उर्वरित जागा “महामेट्रो’ला देण्यात येणार आहे.

ही जागा देताना महापालिकेने काही अटी महामेट्रोला घातल्या आहेत. यामध्ये मिळकतीलगत सीमाभींत बांधणे, या जागेलगतच्या परिसराची देखभाल आणि संरक्षण महामेट्रोने करावे याचा समावेश आहे.

मेट्रो प्रकल्पामध्ये महापालिकेच्या असणाऱ्या आर्थिक दायित्त्वामधून या जागेची असलेली 6 कोटी 82 लाख 8 हजार रुपये किंमत वजा करावी आणि स्वामित्त्वापोटी दरवर्षी एक रुपये नाममात्र भाडे आकारून 30 वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत करण्याविषयी प्रशासनाने अभिप्राय दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.