– जगन्नाथ म. शास्त्री
घरी मातापितरा । धडबोली नाही संसारा । येर विश्वभरी आदर । मूर्ख जैसा ।।
मनुष्याच्या जीवनामध्ये आईवडिलांचे स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलेले असते. प्रत्येक जण अनेक देवतांची भक्ती करत असतो. परंतु प्रत्येकाचे प्रथम दैवत हे आईवडील असतात.
ज्ञानोबाराय म्हणतात, घरामध्ये जो आईवडिलांना आदर देत नाही आणि विश्वाला आदर देतो तो स्पष्टपणे मूर्ख आहे. एवढेच नाही तर आईवडिलांना आदर न देणाऱ्याला जे लोक आदर देतात ते लोकही मूर्ख आहेत.
विश्वातील सर्व तीर्थ आईवडिलांच्या चरणाजवळ असतात. म्हणून त्यांची सेवा हीच मनुष्याच्या जीवनातील श्रेष्ठ भक्ती आहे. कारण जगाच्या पाठीवरती निःस्वार्थ प्रेम करणारे आईवडीलच असतात.
लेकुराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभावनि प्रिती।।