‘देवस्थान म्हणजे पैसे कमवण्याचे साधन नाही’

भुलेश्‍वर – देवस्थान म्हणजे पैसे कमवण्याचे साधन नाही. सर्वांनी आपापल्या परीने भक्‍तांची भाविकता जपा. सुविधा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी केले.

भुलेश्‍वर महादेवाची श्रावण यात्रा दि. 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भुलेश्‍वर मंदिर येथे सुरक्षा, दर्शनबारीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्थेबाबत श्रावण यात्रा नियोजन बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी यात्राकाळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन उद्यानाबाहेर वाहने लावण्याचे नियोजन ग्रामस्थ व जेजुरी पोलिसांनी वतीने केले आहे. महाप्रसाद तर ग्रामपंचायतीच्या वतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार असल्याचे माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी सांगितले. महावितरणकडून यात्रेच्या मार्गावर असणाऱ्या विद्युत तारा बाजूला करून दुसऱ्या मार्गे वळवल्यामुळे सुरक्षा मिळाली आहे.

यावेळी भारतीय पुरातत्व विभागाचे शैलेंद्र कांबळे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, श्री भुलेश्‍वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, उपसरपंच मोहन यादव, ग्रामपंचायत सदस्य माऊली यादव, राजेंद्र गद्रे, रुपाली गुरव, तलाठी सतीश काशीद, देवसंस्थानचे पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे- दोरगे
दौंड तालुका शिवसेना अध्यक्ष श्रीपतराव दोरगे म्हणाले की, भुलेश्‍वर देवस्थान हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. अनेक वर्षांपासून कामे सुरू आहेत. या माध्यमातून तीन वर्षांपासून वाळू, विटांच्या भुग्यांचे, दगडांचे ढीग पडलेले आहेत. मंदिराच्या छतावरील स्लॅब वॉटरप्रूफिंगच्या कामासाठी फोडून तसाच पडला आहे. छतावर पाणी साचून गळून मंदिरात येत आहे. त्यामुळे मंदिराला धोका आहे. याकडे पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.