पाठरवाडी यात्रेत तीन चोरट्यांना भाविकांनी पकडले

दोन मोबाइल हस्तगत, भाविकांचे खिसेही कापले

मंगळसूत्र तोडले, पण…
पाठरवाडी यात्रेत भाविकांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा चोरटे फायदा घेतात. यंदा एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी कट केले. मात्र, ते तुटून त्यांच्याच हातात पडले.

सराईत चोरटे…
चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. रात्रगस्त सुरू असताना पंकज सातपुते याला पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी कोल्हापूरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली होती. तसेच संतोष सातपुते हा सराईत मोबाईल चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कराड – तांबवेसह परिसराचे ग्रामदैवत असलेल्या पाठरवाडी (ता. कराड) येथील श्री भैरवनाथ यात्रेत सोमवारी पहाटे तीन चोरट्यांना भाविकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुभाष आण्णा थोरात (वय 30, रा. वाकुर्डे, ता. शिराळा), पंकज दीपक सातपुते (वय 19, रा. आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड) आणि संतोष तुकाराम सोनवणे (वय 26, रा. येणपे, ता. कराड), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले असून चोरीच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

अंकुश निवृत्ती गिरीगोसावी (रा. विंग, ता. कराड) हे त्यांचा मित्र दादासो रामचंद्र कचरे यांच्यासमवेत पाठरवाडी यात्रेला गेले होते. त्याठिकाणी गर्दीत त्यांच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल अज्ञाताने चोरला. त्याची माहिती त्यांनी उपनिरीक्षक अशोक भापकर आणि उपनिरीक्षक दळवी यांना दिली. त्यानुसार पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना भाविकांना तिघांना पकडून आणले. भाविकांचे मोबाईल चोरून पळून जाताना चोरट्यांना पकडल्याचे भाविकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांना नाव, गाव विचारून त्यांची झडती घेतली असता दोघांकडे विवो आणि स्पाईस कंपनीचा, असे दोन मोबाईल सापडले. दरम्यान, अंकुश गिरीगोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही चोरट्यांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत.

दरम्यान, यात्रेत केवळ मोबाईलसह अनेक भाविकांच्या खिशातील पैसेही चोरीला गेले आहेत. मात्र, अनेकांनी त्याबाबत पोलिसांत तक्रार दिलेली नाही. चोरी करताना तिघे सापडले असले, तरी त्यांच्या बरोबर आणखी साथीदार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. पाठरवाडी यात्रेत गतवर्षी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. मंदीरातून पालखी बाहेर येत असताना झालेल्या गर्दीत चोरट्यांनी भाविकांचे तब्बल 48 मोबाईल लंपास केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.