लोणी काळभोर – पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर शेजारी बसलेला त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली.
महादेव वामन जोगदंड (वय. 27, रा. वडगाव, ता. निलंगा, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर देविदास नामदेव वाघमारे (वय 28, रा. सहजपूर, ता. दौंड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरून महादेव जोगदंड व देविदास वाघमारे हे पुण्यातील हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले अन्न हे पिकअपमधून सहजपूर (ता. दौंड) या ठिकाणी घेऊन जात होते.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या समोर आले असता, महादेव जोगदंड यांचे पिकअपवरील नियंत्रण सुटले व महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. वाहतूक कोंडी सुरळीत करून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.