पाल मंदिर विश्वस्त निवडीबाबतची याचिका फेटाळली

उंब्रज (प्रतिनिधी) -पाल ता. कराड येथील खंडोबा देवस्थानच्या पंच कमिटी निवडीबाबत सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली याचिका कोणतेही संयुक्तिक कारण देता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही रमना, न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ही विशेष याचिका फेटाळून लावली.

पाल हे असंख्य भाविकांचे कुलदैवत आहे. तेथील प्रमुख मानकरी तथा मार्तंड देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष म्हणून देवराज पाटील यांची 23 डिसेंबर 2001 रोजी पाल येथील ग्रामसभेमध्ये निवड करण्यात आली होती. त्याबाबतचा चेंज रिपोर्ट 20 मार्च 2002 रोजी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सन 2018 साली तेथील ग्रामस्थ राहुल ढाणे, सुरेश पाटील, नंदकुमार काळभोर, दिनकर खंडाईत व हरीश पाटील यांनी पुणे येथील सहधर्मादाय आयुक्तांकडे रिव्हिजन अर्ज दाखल करून त्या निवडीला आव्हान दिले.

देवस्थान कमेटी व मानकऱ्यांतर्फे बाजू मांडताना ऍड. शिवराज कदम-जहागिरदार व ऍड. राजन सबनीस यांनी तत्कालीन सह धर्मादाय आयुक्तांसमोर ग्रामसभेची सर्व कागदपत्रे सादर केली. त्यावेळी सदरचे रिव्हिजन हे तथ्यहीन असल्याचे नमूद करून तत्तकालीन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी ते फेटाळले. या निर्णयाविरूद्ध तक्रादारांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती. न्या. ए. एस. गडकरी यांनीही फेटाळून लावली.

त्यानंतर तक्रारदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तक्रादारांना ग्रामसभेत झालेल्या विश्वस्त निवडीची माहिती व चेंज रिपोर्टच्या निर्णयाची माहिती होती. तरीही त्यांनी दाद मागितली.त्यांना कोणतेही संयुक्तिक कारण देता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही रमना, न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. सूर्य कांत यांचे खंडपीठाने ही विशेष याचिका फेटाळून लावली.

अशाप्रकारे विश्वस्त निवडीवर घेतलेले आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळल्याने विश्वस्तांच्या वैधतेवर “सुप्रीम’ कोर्टाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे ऍड. नीला गोखले व ऍड. शिवराज कदम जहागिरदार यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.