“क्वारंटाइन’चा शिक्का असलेला व्यक्‍तीच अंबाबाई मंदिरात

कोल्हापुरात दीड शहाण्यावर दाखल केला पोलिसांनी गुन्हा
कोल्हापूर  – संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही राज्यात होम क्‍वारंटाइनचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरात होम क्वारंटाइन असलेली व्यक्‍ती चक्‍क अंबाबाई मंदिरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आधीच राज्यात संचारबंदी लागू केली होती. करोनाला रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सामाजिक दुरावा. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत होते.

मात्र, अनेकदा आवाहन करूनही काही लोक परिस्थितीच गांभीर्य न समजता समाजात वावरत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढत आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतरही नागरिक ऐकायला तयार नाहीत. सामान्य व्यक्‍तीच नाही तर ज्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का आहे, तेही समाजात वावरत आहे. होम क्वारंटाइनचा शिक्‍का हातावर असतानाही एक व्यक्‍ती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेली. पूजेच्या साहित्यासह गरूड मंडपात गेलेल्या या व्यक्‍तीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला थेट उपचारासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कक्षात दाखल केले. तसेच, या बेजबाबदार व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.