मुंबई – गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल मुंबईतील NIA कार्यालयामध्ये प्राप्त झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. 20 स्लीपर सेल तयार आहेत. तसेच आमच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहे. त्याच्या साह्याने पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचला असल्याचा मेल NIA विभागाला आला होता. यानंतर NIA कडून तसेच सर्व तपास यंत्रणांकडून या मेलची गंभीर दखल घेण्यात आली. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात धमकी देणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असून ती महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या तपासात आढळले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकीचा मेल करणारी व्यक्ती मनोरुग्ण आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच, ही व्यक्ती इंजिनिअर असून ‘अटेन्शन सिकर’ या आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगितले जाते. हा मेल कुठून आला हे समजू शकत नसल्यामुळे सर्वच तपास यंत्रणांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल करणाऱ्याने आपले दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला होता. याशिवाय या मेलमध्ये दोन कोटी लोकांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नाही तर, या कटाचा पर्दाफाश होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत आहे, असेही ईमेल करणाऱ्याने म्हटले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात मेल करणारी व्यक्ती मनोरूग्ण असल्याचे समोर आले आहे.