पुणे : गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्यास आंबेजोगाईत घातल्या बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली कारवाई

पुणे (प्रतिनिधी)  – पुर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन दहशत निर्माण करणाऱ्यास आंबेजोगाई शहरातून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी केली. संबंधीत आरोपी तडीपार असताना त्याने तडीपारीचा भंग करुन गुन्हा केला होता. 

कृष्णा बबन लोखंडे(रा.शनीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.  ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री हनुमाननगर येथील गणेश मंदीराजवळ आंबेगाव खुर्द येथे घडली. यावेळी दोन ते तीन गोळ्यांचे राऊंड फायर करण्यात आले होते.या प्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सोळा ते सतरा जणांच्या टोळक्‍या विरुद्ध खूनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, सिद्दीक मौला शेख (वय.18,रा. शनिनगर आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख व आरोपी गणेश पवार यांची किरकोळ कारणातून भांडणे झाली होती. त्याच्याच रागातून पवार याने शेख याच्यावर त्याच्याकडील बंदूकीतून दोन ते तीन गोळ्या फायर केल्या. तसेच त्याचे साथीदार विशाल सोमवंशी, विनोद सोमवंशी, कृष्णा लोखंडे यांच्यासह इतरांनी फिर्यादीच्या दिशेने दगडफेक करून त्यांचे मित्र अमीर शेख, अली खान, नौशल शेख , समील शेख यांना लाथाबुक्‍यांने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, विक्रम सावंत व सचिन पवार यांना आरोपी लोखंडे हा बीडमधील आंबेजोगाईमध्ये लपल्याची खबर मिळाली. त्यानूसार त्याला पथकाने आंबेजोगाईत जाऊन जेरबंद केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रविंद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.