पुणे – कोणत्याही थेट संपर्काशिवाय युद्धभूमीवर शत्रूशी थेट संघर्ष करण्यासाठी तोफखाना विभागाची कामगिरी निर्णायक ठरते. मैदानी लढाई असो, की पर्वतरांगांमधील युद्ध..प्रत्येक ठिकाणी भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. अशा शब्दांत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सैन्य दलातील तोफखाना विभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
सैन्य दलातर्फे दि.28 सप्टेंबर रोजी तोफखाना तुकडीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी तोफखाना तुकडीला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. “कमी अंतरापासून लांब पल्ल्याचे अंतर गाठणाऱ्या तोफांचे विविध प्रकार सध्या सैन्य दलात समाविष्ट आहे. काळानुरूप यामध्ये अनेक बदल झाले आहेत.
सध्या सैन्याच्या तोफखाना विभागात बॅलेस्टिक मिसाइल, मल्टिबॅरेल रॉकेट लॉन्चर्स, हाय मोबिलिटी गन, विविध प्रकारचे रडार, आणि ड्रोनसारख्या अस्त्रांचा समावेश आहे. स्वातंत्र्य पूर्व काळातील लढाया असोत, की स्वातंत्रोत्तर काळात झालेले युद्ध सर्वच मोहिमांमध्ये तोफखाना विभागाने अतुलनीय शौर्य गाजवले आहे. यासाठी सैन्य दलाकडून दिले जाणारे सर्वोच्च सन्मानही या विभागाला प्राप्त झाले आहे.
पारंपारिक युद्धासोबतच आधुनिक युद्धातही शौर्य गाजविण्यासाठी तोफखाना विभागातर्फे विविध तोफांचे अद्ययावतीकरण केले जात असून, आगामी काळात अधिक सक्षम यंत्रणेसह हा विभाग सज्ज राहील,’ असे लष्कर प्रशासनाने यावेळी सांगितले.