मोदीशाहीला जनताच सुरुंग लावणार

शरद पवार ः गांधी, नेहरूंनी काय केले, विचारणारे स्वतः काय केले याबाबत मौन

कर्जत – जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली. पण सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानपदाचा त्यांनी मान ठेवला नाही. लोकशाहीमध्ये जनता सर्वकाही ठरवत असते. त्यामुळे डोक्‍यात सत्तेची हवा गेलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या एकाधिकारशाहीला लोकसभेच्या निवडणुकीत जनताच सुरुंग लावणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाचे लोकलभा निवडणुकीतील उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. माजी आ. दादाभाऊ कळमकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सक्षणा सलगर, राजेंद्र नागवडे, अविनाश आदिक, राजेंद्र कोठारी, दत्ता वारे, मधुकर राळेभात, विक्रम देशमुख, प्रवीण घुले, प्रकाश देठे आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, राज्याच्या जनतेने शक्ती दिली. पाठिंबा दिला. कॉंग्रेसच्या विचाराने साथ दिली. पुढची 5-50 वर्षे महाराष्ट्र नवीन युवकांच्या हातात जाईल व नवीन पिढी कशी निर्माण होईल, याची काळजी घेतली पाहिजे. या हेतूने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. गांधी, नेहरूंनी काय केले, असे विचारणारे मोदी माझ्यावर टीका करतात. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि साडेचार वर्षांत त्यांनी केलेल्या विकासकामांबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांची खोटी आश्‍वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण आहे.

युवा नेते रोहित पवार म्हणाले, भाजपच्या हेकेखोर लोकांना जनतेची भीती वाटायला लागली आहे. देशातल्या सर्वच विरोधी पक्षांना एकटे पवार हेच एकत्र आणू शकतात. त्यामुळेच मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत. “अच्छे दिन’च्या स्वप्नात त्यांनी संपूर्ण देश भकास केला. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या समर्थकांवर “बुरे दिन’ आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आ. थोरात यांनीही मोदींच्या ध्येय्यधोरणांबद्दल टीका केली. ते म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी सत्तेची पर्वा न करणारे पवार आणि दुसरीकडे शेतकऱ्यांविषयी एक अवाक्षरही न बोलणारे मोदी हे फसवे पंतप्रधान आहेत. कॉंग्रेसने एवढे देऊनही मुलाच्या बालहट्टापुढे त्यांचा “पोरखेळ’ सुरु असल्याची टीकादेखील आ. थोरात यांनी विरोधी पक्षनेते राज्य राधाकृष्ण विखेंचा नामोल्लेख टाळून केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.