ज्यांना मोठे केले त्यांनीच गद्दारी केली

विलास लांडे यांनी मेळाव्यात व्यक्त केली खदखद 

भोसरीत गुंडगिरी, दादागिरी

भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे. सर्वांना घाबरविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र आम्ही भिणाऱ्यांपैकी नाही. हप्तेखोरी, व्यावसायिकांना दमदाटी असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. न केलेल्या कामांची प्रसिद्धी करून जनतेची दिशाभूल सुरू आहे. हा प्रकार थांबविण्याची गरजही माजी आमदार लांडे यांनी यावेळी व्यक्‍त केली.

पिंपरी – सत्तेच्या काळात ज्यांना अजितदादांनी आणि राष्ट्रवादीने पदे दिली, ज्यांना मोठे केले ते आज पक्ष सोडून इतर ठिकाणी गेले. आपल्यातीलही काहीजण ठेकेदारीसाठी इतरांशी हातमिळवणी करत आहेत. विधानसभा निवडणूक जिंकणे सोपे आहे, गरज आहे ती सर्वांनी एकत्र येण्याची. यापुढे तरी योग्य विचार व्हावा, अशी भावना व्यक्‍त करत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी स्वकीयांसह बाहेर पडलेल्यांवर निशाना साधला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) पिंपळे गुरव येथील निळू फुले सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान लांडे यांनी आपली खदखद व्यक्‍त करत पक्षातील व गेल्या काही वर्षांत झालेल्या चुकांचा उहापोह केला. पुढे बोलताना ते म्हणाले, ज्यांना आपण चार-चार पदे दिली ते साथ सोडून गेले. ज्या लक्ष्मण जगतापांना महापौर, स्थायीचे अध्यक्षपद, आमदारकी आणि शहराध्यक्षपदही दिले ते सोडून गेले.

महेश लांडगे यांना स्थायीचे अध्यक्षपद देताना आपण काही मुद्दे उपस्थित केले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना पद दिले. त्यांनी पुढे काय केले हे सर्वश्रुत आहे.आजही अनेकजण एक-दोन ठेक्‍यासाठी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस मांडला आहे. शहराचा विकास आपण केला. मात्र या नेत्यांमुळे जनताही आपल्यापासून दुरावली. केलेली कामे लोकांसमोर मांडण्यात आपण कमी पडत आहोत. भ्रष्टाचार, पालिकेतील सावळा गोंधळ, रिंग आदी बाबी जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. जे सोडून गेले ते गेले आम्ही आजही सोबत आहोत, उद्याही राहू. तीनही जागा जिंकण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे लांडे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)