नवी दिल्ली : भारतात साप आणि हिंदू देवतांचे जुने नाते आहे. भगवान शंकर नेहमी गळ्यात नाग धारण करतात. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी लोक नागांची पूजा करतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना दूध देतात. एकीकडे लोक सापाला घाबरतात, तर दुसरीकडे त्याची पूजाही करतात. सापांना घाबरणे देखील सामान्य आहे, कारण विषारी साप एखाद्याला चावला तर त्याचा जीव वाचवणे कठीण होऊन बसते.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात एक असे गाव आहे जिथे लोक चक्क कोब्रा सापांसोबत राहतात. लोक सापांची पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या घरातही राहू देतात. हे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे, ज्याचे नाव शेटफळ आहे. चला तर जाणून घेऊया की या गावात असे काय आहे की, लोक सापांना घाबरत नाहीत आणि त्यांना त्यांच्या घरातही राहू देतात?
सोलापुरातील शेटफळ गावात लोक मनापासून सापांचे स्वागत करतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक विषारी साप कोब्राशिवाय इतर कोणत्याही सापाला राहू देत नाहीत. या गावात सापांच्या हालचालींवर कोणतेही बंधन नाही. आता तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. या गावात कोब्रा निर्धास्तपणे फिरतात, पण कोणी काही बोलत नाही.
शेटफळ गावाची लोकसंख्या 2600 इतकी आहे. येथे लोक नागांना त्यांच्या घरात प्रवेश देतात. गावातील लोक सापांना घाबरत नाहीत आणि साप कोणाला इजाही करत नाहीत. येथे लोक नागाची पूजा करतात.
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आजपर्यंत येथे सर्पदंशाची एकही घटना समोर आलेली नाही. येथे साप शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये तसेच घरांमध्ये जातात आणि मुलांनाही या सापांची भीती वाटत नाही. येथे मुले सापांमध्ये सहज राहतात आणि वाढतात.
घरात देव्हाऱ्याबरोबरच सापांसाठीही जागा
या गावात लोकांनी नवीन घर बांधले तर ते देव्हाऱ्याबरोबरच सापांसाठी एक छोटीशी जागाही बनवतात. या ठिकाणाला ते देवस्थान असे म्हणतात. या राखीव जागेवर साप बसतात. सापांसोबत राहण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही. पण साप हा लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. या गावात येणाऱ्यांना भीती वाटत असली तरी, त्यांना गावात येताना अंडी, दूध आणि शुभेच्छा सोबत आणण्याचा सल्ला दिला जातो.