चंदीगड – निवडणूक आयोगाने पंजाबसह पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुका जाहीर झाल्याने या राज्यांतील राजकीय वातावरण आता तापले असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या काँग्रेस सत्तेत असलेल्या पंजाबमध्ये आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणांतून देखील आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये चांगली पसंती मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. अशातच आम आदमी पक्षाने आज पंजाबमध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्याची संधी जनतेला दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आम आदमी पक्षातर्फे एक फोन लाईन सुरु करण्यात आली असून यावर लोक फोन करून अथवा एसएमएस व व्हॉट्सऍपद्वारे आम आदमी पक्षातील आपल्या आवडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला मतदान करू शकतील. १७ जानेवारीपर्यंत ही व्होटिंग लाईन सुरु राहणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १७ जानेवारीला पंजाबच्या नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिलेल्या नेत्याचे नाव घोषित करतील. हा चेहरा आम आदमी पक्षाचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असेल.
The phone line is jam packed already 💯
Call/SMS/Whatsapp – 7074870748#JantaChunegiCM pic.twitter.com/7bltBg6ucP
— AAP Punjab (@AAPPunjab) January 13, 2022