मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर निवेदन ट्वीट करण्यात आले आहे. हे माझे एकट्याचे यश नाही तर सहा महिन्यात हे राज्य पुढे नेण्यासाठी साथ देणाऱ्या प्रत्येकाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत आयएएनएस आणि सी व्होटर्सने संयुक्तरित्या सर्व्हे केला आहे. या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपशासित राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन: pic.twitter.com/cgSARFVC65
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 4, 2020
आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता 82.96 टक्के एवढी आहे.