भोरवासीयांनी रांगा लावून केले मतांचे दान

भोरसह वेल्हे, मुळशीत पावसाने दिलासा दिल्याने टक्केवारी वाढली

भोर- भोर विधानसभा मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्‍यात पावसाने आज विश्रांची घेतल्याने मतदारांनी निवडणुकीतील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. भोर मतदार संघात एकूण 62.80 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

भोर विधानसभा मतदार संघात एकुण 529 मतदान केंद्रावर प्रशासनाने मतदारांसाठी चोख व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रीया पार पडली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे उपविभागीय आधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भोरचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले.

भोर तालुक्‍यातील 239 मतदान केंद्रावर तर वेल्हा तालुक्‍यातील 95 मतदान केंद्रावर आणि मुळशी तालुक्‍यातील मतदारांनी मतदान करुन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. सायंकाळी 5 वाजे पर्यंत भोर विधानसभा मतदार संघात 2 लाख 15 हजार 578 मतदारांनी मतदान केले होते तर मतदानाची टक्केवारी 60.80 टक़्के अशी होती. सायंकाळी 7.00 वाजेनंतर निवडणुकीतील 7 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत ( ईव्हीएम मशिन मध्ये) सिलबंद झाले असून निवडणुकीचा निकाल गुरूवारी (दि.24) भोर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे इमारतीत जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस आणि शिवसेनेतच झाली असल्याची चर्चा असून या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार याकडे भोर वेल्हा मुळशितील लोकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.