रस्त्याअभावी टाकळी खातगावच्या वृद्धाने गमावला जीव

टाकळी खातगाव – स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे लोटली तरी, महाराष्ट्रातील दुर्गम वाडीवस्तीवरील भागातील जनतेचा विकास सोडा पण प्राथमिक सोयी सुविधाही त्यांना उपलब्ध नाहीत. नगर तालुक्‍यातील टाकळी खातगाव हे त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. रस्ता नसल्याने टाकळी खातगाव या गावात राहणाऱ्या एका वृध्दाला आज आपला जीव गमवावा लागल्याची लाजीरवाणी घटना येथे घडली.

रात्री अपरात्री आजारी पडणाऱ्याच्या नशिबी फक्त मृत्यूच. कारण रस्ता नसल्याने वाहन नाही, वाहन नसल्याने वेळेत उपचार नाहीत. विठ्ठल चिमाजी सोनवणे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आजही या वाडीतील कुटूंबे, वयोवृद्ध, स्त्रिया रस्त्या अभावी थेट मृत्यूला सामोरे जात असल्याचे वास्तव विठ्ठल सोनवणे यांच्या मृत्यूने समोर आले आहे. रस्त्याच्या मागणीकडे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झाली तरी, टाकळी खातगाव सोनवणे वस्ती साध्या रस्त्याची सुविधा प्राप्त करु शकली नाही, हे कटू आणि विदारक सत्य आहे.

वाडीत जी काही पाच सहा कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यांना अक्षरशः जीव मुठीत धरुनच राहावे लागतेय. प्रकृती बिघडल्यास मृत्यूचाच स्वीकार करण्याची दुर्दैवी वेळ येथील कुटुंबांवर येत आहे. वाडीत कोणी किरकोळ आजारी पडले तर, त्याला आयुर्वेदीक औषधांवर बरे केले जाते. हे सर्व अत्यंत वेदनादायी आहे. यामुळेच सोनवणे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तरी लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी टाकळी खातगाव सोनवणे वस्तीच्या रस्ता समस्येकडे गांभीर्याने पाहतील का हा खरा प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.