सातारा – वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची सुंदर प्रतिकृती साकारण्याची किमया मुख्याध्यापक नागेश मोने यांनी केली. या कलाकृतीची दखल खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेत मुख्याध्यापक नागेश मोने यांचे अभिनंदन केले आहे. उपक्रमशील मुख्याध्यापक मोने यांच्या कल्पकतेची ही बातमी सोशल मिडीयातून महाराष्ट्रात गाजली होती.
शासनाच्या “सर्व शिक्षा अभियाना’चे बोधचिन्ह असलेली ही पेन्सिल चर्चेचा विषय ठरली आहे. एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही केली नसती. कारण वठलेले झाड म्हटले की ते निरोपयोगी. परंतु द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवत असते. शाळेच्या आवारात असलेले हे झाड तोडून टाकण्यापेक्षा त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे काही तरी घडविण्याची कल्पना नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून आली आणि त्यातूनच ही पेन्सिलची सुंदर प्रतिकृती उदयास आली. ही पेन्सिलची प्रतिकृती शाळेच्या आवारात दिमाखात उभी असून ती लोकांचे लक्ष आकर्षित करत आहे.
डिजिटल प्रभातने प्रसिद्ध केलेली मूळ बातमी येथे वाचा…
https://wp.me/p6cW7J-55NE
मोने यांच्या या कलाकृतीची ख्याती जिल्ह्याबरोबरच राज्यातही पसरली असून शनिवारी तर खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची दखल घेत फेसबुक पोस्टद्वारे शाळेचे मुख्याध्यापक नागेश मोने यांचे अभिनंदन करतानाच त्यांना या कलाकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. मोने यांच्या या कलाकृतीची दखल शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यामुळे द्रविड हायस्कूल चांगलेच चर्चेत आले आहे.