फोटो काढायला गेले मोराचा, “फ्रेम’ झाला बिबट्या

आंबेगाव तालुक्‍यातील साकोरे येथे दिवसाढवळ्या बिबट्याचे वास्तव्य

मंचर, दि. 21 (प्रतिनिधी) – साकोरे गाडेपट्टी (ता. आंबेगाव) येथील माणक डोंगरावर मोराचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलांच्या मोबाइल कॅमेऱ्यात बिबट्या आल्याने मुलांची एकच धांदल उडाली. भीतीने घाबरलेल्या मुलांनी डोंगरउताराचा रस्ता धरून घर गाठले.

साकोरे येथील माणकाच्या डोंगरावर दिवसा बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. शेतकरी भिवशेन विठ्ठल लोहोटे हे नातवंडे ओंकार आणि अपूर्वा यांच्यासमावेत डोंगरावर मोरांचे फोटो काढत असताना अचानक बिबट्या जोरात आडवा पळत गेला. हे पाहून त्यांना काही सुचत नव्हते. कोणत्यातरी प्राण्याच्या मागे बिबट्या लागला होता. मोरांचा फोटो काढण्यासाठी गेलो; पण बिबट्या “लाईव्ह’ दिसला, असे म्हणत घाबरलेल्या नातवंडांनी जिवाच्या भीतीने घराकडे पळ काढला.

मंचर येथील वनरक्षक राजेंद्र गाढवे यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष गणेश गाडे यांनी सांगितले. साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदुर या गावांच्या सरहद्दीवर माणका डोंगर आहे. वनविभागाची मोठी वनराई असल्याने ससे, मोर, माकडे, बिबट्या यांचे वास्तव्य नेहमी येथे असते. या परिसरात ऊसतोडणी सुरू झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा नसल्याने तो सैरभैर झाला आहे. त्यात त्याला भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांवर हल्ले वाढले आहेत. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून, जीवघेणे हल्ले होण्याची शक्‍यता असल्याने बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा. अशी मागणी साकोरे ग्रामपंचायतीच्या सदस्या जयश्री मोढवे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.