उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध : दिलासा मिळण्याची चिन्हे
पुणे – पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या मुलाखतीशिवायच्या शिक्षक भरतीतील अडथळे दूर करुन आता प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची निवड यादी प्रसिद्ध करण्याचा क्रमही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच वेळापत्रक जाहीर करुन त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शिक्षक भरतीची पहिली निवड यादी 9 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, यात काही पात्र उमेदवारांना संधी मिळाल्या नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. योग्य त्या पुराव्यांसह दाखल झालेल्या अर्जांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, पात्र उमेदवारांना नियमाप्रमाणे न्याय मिळवून देण्यासाठी वाटचाल करण्यात आलेली आहे.
प्रक्रियेसाठी आता शिक्षण विभागाकडून क्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यात बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी सुधारित यादी लवकरच प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. उर्दू माध्यमाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार उपलब्ध नसल्याने ही रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शासन परवानगी आवश्यक
खासगी शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार काम करण्यात येणार आहे. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या रिक्त जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गामधून पदे भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.