पुणे – भूमी अभिलेख विभागाने राज्यातील 1 कोटी 67 लाख सातबारे उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यांसाठी नागरिकांना ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेले हे सातबारे उतारे सर्व कायदेशीर व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही.
भूमी अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्याला मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्याची भूमिका आहे. त्यादृष्टीने भूमी अभिलेख विभागाकडून सातबारे, फेरफार आदी प्रकारचे दस्ताऐवज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी भूमि अभिलेख विभागाकडून सातबारे उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
तसेच ई फेरफारअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली जात आहे. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून नागरिकांना ऑनलाइन सातबारे उतारे उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यामध्ये आणखी एक पाऊल टाकत भूमी अभिलेख विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली आहे, असे सांगण्यात आले.
पडताळणी सुविधा उपलब्ध
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पात डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्यावर प्रिंट काढल्याची तारीख व वेळ असणार आहे. त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा खरा आहे, की खोटा हे तपासण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर हा क्रमांक पाहून त्याची सत्यता पडताळून पाहता येणार आहे. त्यासाठी पंधरा रूपये शुल्क आकरले जाते. आतापर्यंत एक लाखाहून अधिक नागरीकांनी त्याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.