करोनामुक्‍त वनवासमाची पॅटर्न राज्यात आदर्श

पराग शेणोलकर

कराड  -जगभरात थैमान घातलेल्या करोनाला चितपट करण्याचे काम कराड तालुक्‍यातील उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राने करून दाखवले आहे. येथील वनवासमाची, चरेगाव, खोडशी ही गावे करोनामुक्‍त झाली आहेत. यासाठी प्रयत्न करणारे डॉक्‍टर, आरोग्य सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा वकर्स, पोलीस प्रशासन आदींचा अनुभवाचा फायदा राज्याला होऊ शकतो, हे लक्षात घेऊन करोनामुक्‍तीचा वनवासमाची पॅटर्न राज्यात राबवणे गरजेचे आहे.

बाबरमाची येथील नागपूर रिटर्न करोना बाधिताच्या सहवासात आल्याने वनवासमाची, ता. कराड येथील 35 वर्षीय युवक दि. 21 एप्रिल 2020 रोजी करोनाबाधित झाला. आणि बघता-बघता संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली. एक, दोन, चार अशा पध्दतीने एकच गावात तब्बल 39 जण करोनाबाधित रूग्ण झाले. तर एकाच दिवशी 12 जण पॉझिटिव्ह झाल्याने तालुक्‍यासह जिल्ह्याला मोठा धक्‍का बसला. वनवासमाची येथील ही साखळी खंडीत होणार की वाढणार? याविषयी अनेकांनी तर्कवितर्क काढले. सातारा जिल्ह्यात करोना बाधितांचे आगार म्हणून वनवासमाची गावाची नवीन ओळख तयारी झाली.

मात्र, करोनाच्या लढ्यात उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय कुंभार, ग्रामसेविका जाधवर, आरोग्यसेवक-सेविका, आशा वकर्स तसेच पोलीस प्रशासन यांनी स्वतःला झोकून दिले. पहिला रूग्ण सापडलेल्या दिवसापासून जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका पोलीस निरीक्षक सुधीर धुमाळ, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढ्याला सुरूवात केली.

सर्वप्रथम गावातील प्रवेश बंद करण्यात आला. करोना आजार व घ्यावयाची काळजी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व त्यांच्या पथकाने जनजागृती सुरू केली. गावाची पाहणी करून स्वतंत्र आरोग्यविषयक कृती आराखडा तयार करून कामाला सुरूवात केली. जंतूनाशक फवारणी, मास्क-सॅनिटाझर वाटप व वापर, करोनासदृश लक्षणे असणाऱ्या लोकांचा सर्व्हे सुरू केला. तसेच बाधित रूग्णांच्या निकट सहवासीत लोकांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले. लो रिस्क असणाऱ्यांना होम क्‍वारंटाइन करून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. हे काम गेली महिनाभर अहोरात्रपणे सुरू होते.

परंतु, वाढत्या प्रार्दुभावाचे खापर ग्राऊंडवर काम करणाऱ्या आरोग्य विभागावर फोडण्यात आले. यावेळी डॉ. संजय कुंभार यांनी गावात जंतूनाशक फवारणीचे प्रमाण वाढणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याविषयी सक्‍ती करण्याची गरज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिंह यांना दिली. त्यांनतर पोलीस प्रशासन व पंचायत समितीने तातडीने प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या. आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने वनवासमाचीतील बाधित रूग्ण कृष्णा, सह्याद्री व उपजिल्हा रुग्णालयातून करोनामुक्‍त झाले. दि.22 मे रोजी वनवासमाचीचा अखेरचा रूग्ण करोनामुक्‍त झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.