चाचण्यांचे प्रमाण कमी : संसर्गाचा दर 27 टक्क्यांवर
पिंपरी – ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील करोना रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. दररोज सरासरी 700 रुग्ण करोनाबाधित आढळत आहेत. हाच दर जुलै महिन्याच्या अखेरीस एक हजारांवर गेल होता.
रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी संसर्गाचा दर मात्र वाढला आहे. कारण तपासण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या घटली आहे. मात्र यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महपालिकेने प्रसिद्ध केलेले प्रसिद्धीपत्रक, संकेतस्थळावरील डॅशबोर्ड व महापालिका अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस शहरातील रुग्णसंख्या 900 ते 1000 च्या पटीमध्ये दरदिवशी वाढत होती. लॉकडाऊन केल्यानंतर रुग्णसंख्या अचानक वाढण्यास सुरूवात झाली. त्यावेळी साधारणपणे 5 हजार ते साडेपाच हजार रोजच्या चाचण्या केल्या जात होत्या. त्यावेळी संसर्गाचा दर हा 21 ते 22 टक्यांवर होता.
25 जुलै रोजी 1079 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर याचदिवशी तब्बल 5217 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. 29 जुलैला 1077 रुग्ण तर 5172 संशयित दाखल करण्यात आले होते. महिन्याच्या शेवटी म्हणजेच 31 जुलैला 913 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यावेळी संशयित रुग्णांनुसार संसर्गाचा दर 22 टक्के होता.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरूवात झाली. गेल्या चार दिवसांमध्ये सरासरी 700 ते 800 या दरम्यान रुग्णसंख्या आढळत आहे. 1 ऑगस्ट रोजी 2834 रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 826 जण बाधित असल्याचे निष्पण झाले. म्हणजेच संसर्गाचा दर 29.15 टक्के होता. 2 ऑगस्टला 2484 चाचणींमधून 808 बाधित व 32.53 टक्के संसर्गाचा दर होता. हा दर पुढच्या दोन दिवसात आणखी घटला आहे. 3 ऑगस्ट रोजी 2729 चाचण्या केल्या. त्यामध्ये 739 बाधितनुसार 27.08 संसर्गाचा दर होता. 4 ऑगस्टला 3419 जणांची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये 953 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर संसर्गाचा दर 27.87 टक्के होता. मागील महिन्यामध्ये रुग्णसंख्या जास्त असतानाही संसर्गाचा दर 21 ते 22 टक्के यामध्ये होता. मात्र आता रुग्णसंख्या घटत असली तरी त्याप्रमाणात चाचण्या होत नसल्याने संसर्गाचा दर वाढला आहे.
डॅशबोर्ड मायनसमध्ये
सुरुवातीपासूनच महापालिकेचा डॅशबोर्ड आणि महापालिकेच्या प्रेसनोटमधील करोनाबाबतच्या आकड्यांमध्ये प्रचंड तफावत जाणवत आहे. सुरुवातीला डॅशबोर्डला करोनाबाधितांचे आकडे अधिक असत आणि प्रेसनोटमध्ये कमी दाखविले जात होते. परंतु रविवारपासून एकूण करोनाबाधितांच्या आकड्यांबाबत डॅशबोर्ड मायनसमध्ये जाताना दिसत आहे. सोमवारी महापालिकेच्या प्रेसनोटमध्ये एकूण करोनाबाधितांचा आकडा 24311 दर्शविण्यात आला होता. तर मंगळवारी प्रेसनोटमध्ये एकूण करोनाबाधितांचा आकडा 25106 झाला. परंतु महापालिकेच्या डॅशबोर्डवर मंगळवारी रात्री आठ वाजता देखील एकूण करोनाबाधितांचा आकडा पालिकेच्या सोमवारच्या प्रेसनोटपेक्षाही कमी दिसत आहे. डॅशबोर्डने गेल्या 24 तासांमध्ये 525 नवे करोनाबाधित दर्शवूनही एकूण बाधित मात्र 24275 च दर्शविले आहे.
जशी आवश्यकता वाटेल तशा चाचण्या सुरू आहेत. बाहेरील रुग्णांच्या बाबतीत अनेक जण शहरातील नातेवाइकांचा पत्ता देत आहेत. त्यामुळे बाहेरील रुग्णांची नोंद जास्त होत नाही. ती आपल्याकडेच होते. त्यामुळेच तीन दिवस एकही बाहेरील रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. मात्र आपण कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ करत नाही.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त