बारामती (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना तपासणी प्रयोगशाळा तातडीने सुरु करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील प्रयोगशाळेची उभारणी तसेच रुई ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 50 खाटांच्या क्षमतेची कोरोना हेल्थ केअर सेंटरची तातडीने उभारणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
कोरोनच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी दाखवलेले धैर्य व सहनशिलतचे कौतुक करत लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे अवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर अधिकारी व पदाधिका-यांच्या बैठकीत अजित पवार यांनी शहर व तालुक्याचा आढावा घेतला . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना देखील यावेळी केल्या .
भीलवाडा तसेच बारामती पॅटर्ननुसार बारामतीकरांना घरपोच सेवा देण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तुटेपर्यंत लॉक डाऊनला सर्वांनी सहकार्य करावे घरातून कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. तसेच गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून स्वस्त धान्य दुकानचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी तहसीलदार यांना केल्या.
ग्रामीण भागात फवारणी, जीवनाश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, बाहेरुन आलेल्या लोकांची तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्र आढावा बारामती शहर व तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी या संकटसमयी दवाखाने सुरु ठेवून सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटनेते सचिन सातव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक किरण गुजर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, हनुमंत पाटील, विश्वास ओहोळ आदी या बैठकीस उपस्थित होते.